इनोसन्स ओव्हरलोडेड

आत्ता खरं सांगायचे झाले तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे अशी काहीशी मनाची अवस्था झाली आहे. का म्हणून विचारता आहात? त्याला कारणही तसेच...

Thursday, 30 April 2020

इनोसन्स ओव्हरलोडेड

आत्ता खरं सांगायचे झाले तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे अशी काहीशी मनाची अवस्था झाली आहे. का म्हणून विचारता आहात?
त्याला कारणही तसेच आहे.  
वाचकहो, माझ्या बेसूर गाण्यावर खुष होऊन दाद देणारा मला चक्क एक श्रोता मिळाला आहे.
त्यामुळे 'आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पीछे' असे म्हणत मी वेगळ्याच दुनियेत रमले आहे. 
खरे तर आपल्याला चांगले गाणे म्हणता येईल अशी मला का कोण जाणे, पण पक्की खात्री होती. 
त्यासाठी मी खरंच खूप धडपड पण केली हो!!!
पण मेलं ते सूर, लय आणि ताल कायम माझ्याशी शत्रूत्व असल्यासारखे माझ्यापासून दूरच राहतात. 
छान काहीतरी गुणगुणावे म्हणावे तर एक सुद्द्धा मदतीला येत नाही. मला ते दुरून चांगले दिसत असतात. पण घशाच्या आसपासही फिरकत नाहीत.
खूप राग येऊन मी चिडून त्यांना म्हणायचे, " गद्दारांनो, अरे तुम्हाला आत्मसात करण्यासाठी राब राब राबले रे मी!!! अरे,अनेक हाडाच्या गुरुंनी माझ्यापुढे हार मानून काढता पाय घेतला. मी मात्र अजूनही हार मानायला तयार नाही. हे सुरांनो, थोडी तरी किव करा माझ्या कष्टांची."
पण त्यांनी जणू, " पाषाणाला गाणं येईल पण तुला येणार नाही," हे माझ्या एका गुरूंचे शब्द खरे करण्याचा विडाच उचलला होता.
तेव्हापासून आजतागायत आपल्याला गाणे म्हणता येत नाही ही खंत मनाला होती.
होती....हं ... म्हणजे आता नाहीये बर का...
कारण काय तर माझा तो लाडका श्रोता. 
कोण असेल बरर्र्.....
नुकतेच इवल्या इवल्या पावलांच्या रूपांनी घरात चिमुकलीचे आगमन झाले.तिला खेळवताना, झोपवताना नकळत कोणाला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात गाणी गुणगुणू लागले.
अहो, काय आश्चर्य !!! ते इवले इवले डोळे माझ्यावर रोखले गेले. आधी मला वाटले एवढ्याशा जीवालाही माझे बेसुरेल गाणे कळले कि काय???
पण लगेच त्या इवल्याशा ओठांनी हसून दाद दिली. 
अहाहा ..... मला झालेला काय तो आनंद ...माझ्यात नसलेल्या सूर-लय-तालाकडे फोकस न करता अगदी निरागस दाद मला मिळाली. 
मग काय माझ्या दबल्या  गेलेल्या सुप्त इच्छेने परत डोके वर काढले.
चिव चिव ये, इथे इथे बैस रे मोरा पासून  सुरु झालेला माझा गाण्यांचा प्रवास थेट सिनेगीतांपर्यंत कसा जाऊन पोहचला कळालेच नाही.आजवर जी गाणी माझ्या घशातून बाहेर पडायला चाचरत होती, ती आता अगदी भरभरून बाहेर येत असतात. 
अशा प्रकारे आजवर अनेक चांगल्या चांगल्या गाण्यांची मी मनोसक्त वाट लावली. पण माझ्या प्रिय श्रोत्याकडून येणारा प्रतिसाद मात्र कायम तोच आणि तेच गोड कधी खुदकन तर कधी खळखळून हसणे.


कधी वाटायचे की आपल्या तिला खेळवण्याच्या  किंवा झोपावण्याच्या जीव तोडून केलेल्या प्रयत्नांनावर आपली दया येऊन तर ती दाद देत नाही ना???
पण छे!!! त्या निरागस मनात हे विचार येणार तरी कुठून???
तिचे ते गोड हसणे म्हणजे इनोसन्स ओव्हरलोडेड चा प्रत्यय ...
यावरून मला निरागसता म्हणजे नक्की काय याची अनुभूती आली. 
आपण सर्वसाधारणपणे कोणालाही अमुक खूप निरागस आहे असे म्हणतो.
पण खरी निरागस अवस्था कशी असते हे फक्त अगदी लहान मुलाकडे पाहूनच कळते.
आता तर खूप वेळ या निरागस मनासोबत राहत असल्याने त्याची जाणीव अगदी तीव्रतेने झाली.
कोणी काहीही बोला ... ओरडा... रागवा... गोड बोला..काहीही कळत नाही...
हसू आले कि मनोसक्त हसायचे...रडू आले कि जोरात भोकाड पसरायचे... कोण काय म्हणेल...कोण कोणत्या उद्देशाने बोलतोय ....कसलेच काहीही देणे घेणे नाही....आपल्या दुनियेत मस्त रममाण....
ही अवस्था कायम राहिली तर...
आयुष्य काय धमाल होईल ना....
कोणी काही म्हणा...मला फरक पडणार नाही...मी मस्त स्वतःच्या दुनियेत मशगुल...राग आला तर कसला राग आला सांगून मोकळे...कोणाविषयी काही चांगले वाटले.... मनमोकळे बोलून मोकळे...मनात कोणाविषयी आकस नाही...हेवेदावे नाही... रागलोभ नाही...इर्षा, द्वेष काहीही नाही...
जीवनात उरेल काय ...तर निखळ ...निर्मळ आनंद...
एवढे सोपे असते जगणे???? मग अवघड होण्यास सुरुवात कुठून होते ...शोधलेच पाहिजे...
आपण सर्रास म्हणतो की बालपण आणि म्हातारपण सारखेच असते.
मग म्हातारपण का त्रासदायक वाटत असावे किंवा वृद्ध व्यक्ती का लहान मुलासारख्या वाटत नाही...
म्हातारपणी मन बालिश होते. लहान मुलासारखं हट्ट करणे, मागण्या करणे, न ऐकणे सुरु होते..... 
त्यामुळे त्यांचे वागणे लहान मुलासारखे वाटत असावे....पण फरक कुठे असतो...तर तो निरागसपणात...
या निरागसतेमुळे लहान मुल कोणालाही पटकन आपल्याकडे ओढून घेते.
पण सर्व वृद्ध आनंदी का नसतात किंवा  लहान बाळाला पहिल्यावरआपल्याला जो आनंद अगदी नेहमीच होतो...तसाच आनंद वृद्ध व्यक्तीकडे पाहून नेहमी नाही होत .......
कारण संसारिक व्यापात आणि भौतिक जगात समजदार..जबाबदार...होण्यात  मनाची निरागसता कुठेतरी हरवली जाते....
वास्तविक आयुष्य सुखी समाधानी राहण्यासाठी ती हरवू न देणे ...ती जपणे....खुप महत्वाचे असते.
पण आपणच असं नाही करू...तसं नाही करू...लोकं हसतात...तो अमुक बघ किती छान वागतो...असे करत त्या निरागसतेला सुरुंग लावण्यास सुरुवात करतो.
मग सुरुवात होते जगण्याच्या स्पर्धेच्या तयारीला...त्यातून जन्म घेतात तुलना...इर्षा..आनंद...दु:खं....आशा ...निराशा ...हार ... जीत....
काही लोकं अशा अवस्थेतच शेवटपर्यंत जगतात....तर काही शोध घेतात निखळ न संपणाऱ्या आनंदाचा....
मग शोध सुरु होतो त्या निर्मळ...निरागस  मनाचा...
एकूण काय तर जन्म म्हणजे निरागसतेकडून निरागसतेकडे प्रवास...
जो हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करतो किंवा ही निरागसता कायम जपू शकतो त्यालाच enlightenment किंवा आत्मसाक्षात्काराची अनुभती येत असावी असं मला वाटतं.
सद्या तरी मी आता माझ्या घरात वाहणाऱ्या निरागसतेच्या धबधब्यात मनोसक्त भिजतेय....
या भिजण्यातही खरा आनंद गवसतोय .....असेच भिजून भिजून ती निरागसता माझ्यातही झिरपली तर........

- मंजुषा देशपांडे, पुणे.Sunday, 16 February 2020

ती पहिली रात्र

आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे." लेकीने फर्मान काढले.

तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको म्हणून तसेच गिळून घेतले.

"आता काय खास करायचं आहे ते देखील सांगून टाक ना."

तिला हवा असलेला प्रश्न मी विचारला.

“आई, तुम्हाला सरप्राईज असे काही देताच येत नाही. तूच सांग बरं मी अगदी लहान असल्यापासून काय मागतेय ते?" लेकीने मलाच प्रतिप्रश्न केला.

“कुत्र्याचं पिल्लू? नाही ग बाई, तेवढे सोडून काहीही माग. तुला माहिती आहे की मला सर्व कीटकांची आणि प्राण्यांची खूप भीती वाटते. तुम्ही सगळे निघून जाल आपापल्या कामांना आणि ते पिल्लू येईल माझ्याच गळ्यात. अजिबात नाही." मी अगदी निक्षून सांगितले.

खरेतर कुत्र्यांची मला एवढी भीती का आहे मलाच कळत नाही. बाहेर गेल्यावर रस्त्यावर कुठेही कुत्र्याने मला पाहिले की ते माझ्याच मागेमागे येत आहेत असे वाटू लागते. मग माझा खूप गोंधळ उडतो. मला सारखे वाटू लागते की हे कुत्रं मला चोर समजून चावणार तर नाही ना? हातात पिशवी असेल काही खायचे आहे समजून अंगावर धावणार तर नाही ना? त्यामुळे दूरवर कुठेही कुत्रं दिसले रे दिसले कि मी खूप सैरभैर होते. कारण भराभर चालावे तर तेही जोरात मागे येण्याची भीती आणि हळूहळू चालावे तर पटकन चावायची भीती!!! खरतर सर्व माझी टिंगल करतात, पण आहे मला भिती, काय करू? त्यामुळे घरात पिल्लू येणे शक्यच नव्हते.

माझा ठाम विरोध पाहून लेकीचा चेहरा खूप हिरमुसला.

मी तिला परत समजावले," तुला  तुझ्या मनाप्रमाणे कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला पाठवतो आहोत ना? मग आता पिल्लू आणण्याचा हट्ट सोडून दे."

लेक कशीबशी  गप्प बसली. पण तिची  नाराजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री पर्यंत तशीच होती.

खरंतर तिला प्राण्यांविषयी भयानक म्हणता येईल असे प्रेम आहे. कित्येकदा ती  रस्त्यावरची  पिल्ले उचलून आणत असते आणि मी मात्र तिला ते कोणालाही द्यायला लावते.

त्यामुळे  तिचे नाराज होणे स्वाभाविक होते.

ह्यावेळी मी विचार केला की जाऊ दे, लेक आता एकवीस पूर्ण झाली आहे, चार पाच वर्षांत लग्न होऊन सासरी जाईल. नंतर तिचा हा एकमेव हट्ट आपण पूर्ण न केल्याची खंत मनाला राहील. तेव्हा ह्या वाढदिवसाला तिला पिल्लूच भेट देऊ.

झालं, मी तयारी दाखवल्याबरोबर लेकीच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी आमच्याकडे बिगल जातीच्या पिल्लाचे आगमन झाले. लेक तर सरप्राईज बघून आनंदाने हुरळून गेली. बरं, एवढं करून मी गप्प बसायचे ना? पण लेकीवरच्या अती प्रेमापायी मी तिला जोरात म्हटले, " तू कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला जाशील तेव्हा पंधरा दिवस मी सांभाळ करेन पिल्लाचा. माझ्याकडून तुला ही अजून एक भेट". लेक प्रेमाने गळ्यात पडली. लेकीला झालेला आनंद पाहून मन समाधानाने भरून पावले.

यथावकाश पिल्लाचं ‘चेरी’ म्हणून नामकरण झाले.

चेरीचा वावर घरभर होऊ लागला तसे आपण काय करून बसलो ह्याची जाणीव झाली. ती सारखी इकडून तिकडे पळून धिंगाणा घालू लागली. चेरीने माझ्याकडे नुसते पाहिले तरी मी धूम ठोकायचे. मला पळताना पाहून ती अजून जोरात माझ्या मागे  लागायची. मी अजूनही पळू शकते हे चेरीनेच मला दाखवून दिले. बर, एवढ्या मोठ्या घरात तिला मला सोडून इतरांच्या मागे लागायला काय हरकत होती? पण मी दिसली कि ती जोरात माझ्याकडे येणार!

लेक मला समजवायची,” आई, ती प्रेमाने येते ग, ती खरंच तुला काहीच करणार नाही. तिला फक्त तुझ्याशी खेळायचे असते. एकदा बघ ना ती किती निरागस आहे.” भीतीपुढे मला ना चेरीचे निरागस डोळे दिसायचे, ना तिचे खेळणे दिसायचे. तिला बघून जाणवायची फक्त भीती, भीती आणि भीती. लेक मात्र तिचे शी शू पासून सर्व अगदी मनापासून करत होती.

बघता बघता लेकीची हैद्राबादला प्रशिक्षणाला जायची वेळ आली. चेरीला सांभाळण्याच्या भीतीने पोटात गोळा आला होता. सर्व सूचना देऊन लेक रवाना झाली.

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र.... आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर.....एकदम सुरक्षित!!!

पण झोपायची वेळ होताच तिने रंग दाखवायला सुरवात केली. तिला काहीही करून दिवाणावरच यायचे होते. आधी तिने बारीक आवाजात रडका सूर लावून बघितला. मी दाद देत नाही म्हटल्यावर ती माझ्याकडे बघून भुंकायला लागली. तिची नजर खूप भेदक वाटली. वाटले की आता केव्हांही आपल्यावर हल्ला होऊ शकतो.

मी तिला जीव तोडून सांगत होते,” बाळा, मला तुझी भीती वाटते ना, मी तुला उचलून नाही घेऊ शकत ग!”

पण त्या बिगलच्या लांब लांब कानांमध्ये काही माझा आवाज शिरत नव्हता. तिचे आपले रडणे, भुंकणे चालूच. आता ती खूप चिडली तर रागात दिवाणावर चढेल ह्या भीतीने मला घाम फुटला. मी उशी तोंडावर घेऊन तिची नजर टाळत जोरजोरात सर्वांना बोलावले. काय झाले म्हणून घरातले सर्व दाराजवळ आले तर दरवाजा उघडेचना...चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला होता. म्हणजे मला दिवाणावरून खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपले काही खरं नाही असे वाटू लागले. शेवटी सर्व धीर एकवटून उशीची ढाल बनवून कसाबसा दरवाजा उघडला. मुलाने मांडीवर घेतल्यावर चेरी पटकन झोपली.

पण मला झोप कुठे लागते? सतत कानांत चेरीचा आवाज घुमत होता. ती आपल्याला चावायला आली आहे असे वाटून धडधड होत होती. मध्येच दचकायला होत होते. ह्या घाबरण्यातच नेमके माझे पांघरूण धपकन खाली पडले आणि चेरी परत उठून बसली.

परत तिची तशीच चुळबूळ सुरु झाली. आता परत घरातल्यांची झोप मोडायला नको म्हणून मी दुरूनच तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात अचानक विचार आला की जसे लहान मुलांना झोपवायला अंगाईगीत असते तसे आता प्राण्यांसाठीही काही गाणी असतीलच. मग लगेच गुगल वर शोध घेतला आणि गाणे मिळवले. त्या गाण्याने मी पेंगले पण ती काही झोपायलाच तयार नव्हती. आता तिला मांडीवर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

लेकीचे सर्व बोलणे आठवले. तिने सांगितले होते, “आई, पिल्लू जेव्हा खाण्याच्या आणि झोपेच्या मूड असते ना तेव्हा मस्ती करून चावत नाहीत. तसेच कुत्रं जेव्हा शेपूट हलवत जवळ येतं तेव्हा ते प्रेमाने जवळ येत असते. त्यामुळे तू उगाचच घाबरत जाऊ नको. लहान पिल्लू आपल्याला कधीच चिडून चावत नसतं. ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं.”

सगळं काही आठवून चेरीचे लक्षणे तपासली. ती शेपूट हलवत भुंकत होती आणि झोपेच्या मोडमध्ये गेली होती.

मग खूप खोल श्वास घेतले आणि मनाचा धीर करून मोठं जाड पांघरूण पायांवर घेऊन खाली बसले. ती जोरात येऊन मांडीत बसली आणि माझ्या कुशीत शिरून लगेच गाढ झोपली. मी जीव मुठीत घेऊन घामाने चिंब भिजले होते. पण अजिबात हलले नाही. कारण माझ्या हालचालीने ती परत मस्तीच्या मोडमध्ये जाण्याची भीती होती. पण चेरीच्या त्या स्पर्शाने मी उभा केलेला भीतीचा बागुलबुवा कुठच्या कुठे पळून गेला. मग वाटले की अरे इतकी सोपी गोष्ट होती ही आणि आपण किती मोठा भीतीचा डोंगर उभा केला होता. अखेर तिला हळूच खाली झोपवलं आणि मी देखील झोपेच्या अधीन झाले. अशाप्रकारे चेरीची आणि माझी ती पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे. 
Saturday, 15 February 2020

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द  बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत  मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच  दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
 त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.